अलिबाग- माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात झोपून त्यांनी हे आंदोलन केले.  श्रीवर्धन मधून कर्जत येथे बदली झालेल्या सात शिक्षकांना तातडीने बदली झालेल्या  शाळांमध्ये रुजू होण्यास सांगावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. जोवर या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितले जाणार नाही तोवर कार्यालयातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला होता.

कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांवर श्रीवर्धन मधील सात शिक्षकांची बदली करण्यात आली होती. मात्र बदली होऊनही शिक्षक शाळांवर हजर झाले नाहीत. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना सोडले नसल्याने ते हजर होत नसल्याची बाब समोर आली. या शिक्षकांना तातडीने बदली झालेल्या ठिकाणी हजर करावे यासाठी लाड शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून तोंडी आदेश असल्याने म्हसळा, श्रीवर्धन आणि तळा येथील शिक्षकांना सोडता येणार नसल्याचे शिक्षणविभागाने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लाड यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठत ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. पथारी पसरून झोपून आंदोलन करण्यास सुरु केले. माजी आमदारांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला.

उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी लाड यांच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. शिक्षकांना सोडायचे नव्हते तर बदल्या का केल्या असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला. जोपर्यंत शिक्षकांना हजर होण्याचे आदेश देणार नाही तोवर मी कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केल्या बदल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. म्हसळा, तळा आणि श्रीवर्धन तालुक्यातून शिक्षकांच्या बदल्या केल्या पण तिथे पर्यायी शिक्षक दिलेले नाहीत. त्यामुळे एकही शिक्षक नसल्याने तिन्ही तालुक्यातील शाळा बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जोवर पर्यायी शिक्षक मिळत नाही तोवर तिनही तालुक्यातील शिक्षकांना सोडू नका अशा सूचना केल्या आहेत. कर्जत मध्ये शिक्षकांअभावी शाळा बंद पडेल अशी परिस्थिती नाही. आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

मंत्री  महोदयांच्या तोंडी निर्देशानुसार शिक्षकांना सोडलेले नाही. आम्ही या प्रकरणात काय करता येईल बघत आहोत. – नेहा भोसले. मुख्य कार्यकारी अधिकारी