राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ७७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह ४७ कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशाने शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगावमधील सामाजिक कार्यकर्ते भास्करराव संजय काळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल शुक्रवारी रात्री त्यांनी शिर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली.
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात संस्थान कर्मचारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या अखत्यारीत व जबाबदारीमध्ये असलेल्या विद्युत साहित्यांची डेडस्टॉक रजिस्टरप्रमाणे नोंदणी न ठेवता विद्युत साहित्याची चोरी केली व डेडस्टॉक रजिस्टरमध्ये बनावट नोंदी केल्या. ज्यावेळी गैरव्यवहार उघडकीस आला, त्यावेळी अतिरिक्त विद्युत साहित्य या ठिकाणी जमा केले आहे. याबाबत लेखापरीक्षण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, वरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून ७७ लाख १३ हजार रुपयांची वीज साहित्याची चोरी करून त्याचा अपहार केला आहे.
त्यात सर्व ४७ आरोपींवर स्वतंत्रपणे चोरीच्या साहित्याच्या रकमेची जबाबदारी निश्चिती केली आहे. त्यापैकी ३९ आरोपींनी त्यांच्यावर निश्चित केलेल्या जबाबदारीची रक्कम संस्थांनमध्ये भरणा केली आहे. तर उर्वरीत ८ आरोपींनी त्यांच्यावर निश्चित केलेल्या जबाबदारीची रक्कम भरणा केली नाही. अशा प्रकारे सर्व ४७ जणांनी कट करून विद्युत साहित्य चोरी व गैरव्यवहार केलेला आहे, असे संजय काळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती व त्यात उच्च न्यायालयाने दि. १५ ऑक्टोबर रोजी त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आदेशीत केले होते. त्यानुसार काल, शुक्रवारी रात्री शिर्डी पोलीस ठाण्यात साईबाबा संस्थानच्या ४७ कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे प्रशासन ४७ जणांवर काय कारवाई करणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. या प्रकाराने शिर्डीसह साई संस्थान वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजय काळे यांच्या पाठपुराव्यातून हा घोटाळा उजेडात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली आहे. पोलीस तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे साईभक्तांचे लक्ष राहील.