पंढरपूर : आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्यांनी पंढरीला प्रस्थान ठेवले आहे. अशीच मात्र थोडी वेगळी अनोखी दिंडी पंढरपुरातून काढण्यात आली होती. राज्यातून ८० शहरांतील जवळपास ४ हजार सायकलस्वारांची दिंडी पंढरीत पोहोचली होती. अध्यात्माबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला असून, सायकलस्वारांना जी काही मदत लागेल ती मदत माझ्या मंत्रालयाकडून देवू, असे केंद्रीय क्रीडा, युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.
येथे सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते. राज्यातून ८० ठिकाणांहून हे सायकलस्वार पंढरीत दाखल झाले होते. जवळपास चार हजार सायकलस्वारांच्या या दिंडीला हिरवा झेंडा केंद्रीय मंत्री खडसे व पालकमंत्री गोरे यांनी दाखविला. यावेळी मंत्री खडसे, गोरे आदींनी सायकल चालवून दिंडीत सहभाग नोंदविला.
वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे या दिंडीने नगरप्रदक्षिणा केली. यावेळी केंद्रीय मंत्री खडसे यांनी रविवार हा सायकल वार म्हणून ओळखला जातो. ‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. एकीकडे शहरात महास्वच्छता अभियान सुरू असताना दुसरीकडे शहरात सायकलस्वार दिसून येत होते. असे असले तरी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकलस्वारांमुळे आज पंढरीनगरी वेगळ्याच वातावरणात सामावून गेलेली पहायला मिळाली.