Vishalgad Fort Sambhajiraje Chhatrapati Protest : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व हजारो शिवभक्तांनी किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार खडबडून जागं झालं असून मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सोमवारपासून (१५ जुलै) किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र विशाळगड वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विशाळगड परिसरात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक नेत्यांनी संभाजीराजेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेला संभाजीराजे यांनी काही वेळापूर्वी उत्तर दिलं. संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तसेच त्यांच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ का आली? ते देखील सांगितलं. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मागील दोन-तीन वर्षांपासून अनेक शिवभक्त माझ्याकडे येऊन म्हणायचे, तुम्ही विशाळगड किल्ल्याकडे लक्ष का देत नाही. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी मी किल्ल्यांशी संबंधित काही संघटना, प्रामुख्याने विशाळगडावर काम करणारी गडकोट प्रेमींची संघटना व शिवभक्तांना एकत्र घेऊन विशाळगड किल्ल्याला भेट दिली. तेव्हा आम्ही तिथे भयानक परिस्थिती पाहिली. किल्ला अतिशय गलिच्छ अवस्थेत होता. मुस्लिमांसह हिंदू धर्मातील लोकांनीही या किल्ल्यावर अतिक्रमणं केली होती. त्यामुळे आम्ही सर्व शिवभक्त एकत्र आलो आणि ७ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विशाळगडच्या ग्रामस्थांनाही आम्ही बोलावून घेतलं होतं आणि किल्ल्यावरील अतिक्रमणाचा विषय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. विशाळगडावरील ग्रामस्थांनी देखील किल्ल्यावर अतिक्रमण झाल्याचं मान्य केलं. अतिक्रमण झालंय हे सिद्ध झाल्यावर कोल्हापूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा किल्ला अतिक्रमणमुक्त व्हायला हवा असे निर्देश दिले. छायाचित्रात १) किल्ले विशाळगड येथे जमावाने घर पेटवून दिले. २) वाहनांची नासधूस करण्यात आली. ३) मोहिमेमध्ये सहभागी झालेले संभाजी राजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र - लोकसत्ता टीम/ग्राफिक्स) "जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत एकूण १५८ अतिक्रमणांची यादी केली आणि ती जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. ही अतिक्रमणं काढण्यास सुरुवातही झाली होती. मात्र तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी त्याविरोधात उभे राहिले आणि त्यांनी कारवाईला खो घातला. या लोकप्रतिनिधींनी व अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी सर्वांना असं भासवलं की या अतिक्रमणांवरील कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याचं काम थांबवण्यात आलं." हे ही वाचा >> नारायण सुर्वे यांच्या घरी चोराने मारला डल्ला, नंतर चिठ्ठी लिहून परत केली वस्तू; म्हणाला, “मला माहीत नव्हतं..” स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे अतिक्रमणांना अभय? संभाजीराजे म्हणाले, "मी काही महिन्यांपूर्वी शिवभक्तांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो. अतिक्रमणाचा विषय जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडला. यावेळी काही तपास करत असताना आमच्या लक्षात आलं की किल्ल्यावरील १५८ पैकी अवघ्या सहा अतिक्रमणांची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. त्या सहा प्रकरणांवरही गेल्या दीड दोन वर्षांत न्यायालयात एकही सुनावणी होऊ शकलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकून हे प्रकरण दाबून ठेवलं होतं. त्याचवेळी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक प्रश्न उपस्थित केला की जर ही सहा प्रकरणं न्यायप्रविष्ठ असतील तर उरलेली १५२ अतिक्रमणं का हटवली नाहीत?" संभाजीराजेंनी सांगितली विशाळगडावरील परिस्थिती माजी खासदार म्हणाले, "आंदोलनासाठी आम्ही किल्ल्यावर गेलो तेव्हा तिथे पाहिलं की किल्ल्यावर मोकळ्या जागेवर कत्तलखाना आहे. तिथे उघड्यावरच बोकड, कोंबड्या कापल्या जातात. त्यांचं रक्त, पंख, मांस सगळं रस्त्यावर उघड्यावर पडलं होतं. अनेक लोक किल्ल्यावर मद्यपान व पार्ट्या करायला येतात. या किल्ल्यावर प्रामुख्याने कर्नाटकमधील लोक पार्ट्या करायला येतात. किल्ल्याची अवस्था पाहून हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे का? असा प्रश्न पडला होता."