संगमेश्वर : चक्क झाडावर बांधलेल्या माचावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेण्याची वेळ प्राथमिक शाळेच्या केंद्र प्रमुखांवर आली आहे. शिक्षण व्यवस्थेत वाढत गेलेल्या मोबाइलच्या महत्वामुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाण च्या शाळेतील शिक्षकांना शाळे पासून दुर, मोबाइल नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी जावून झाडाच्या बांधलेल्या माचावर बसून ऑनलाईन परिक्षा देण्याची पहिल्यादाच वेळ आली आहे. मात्र, यातून संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्रभागातील नारडुवे शाळेचे केंद्र प्रमुख दत्ताराम गोताड यांनी विद्यार्थ्यांमध्ये लावलेल्या परिक्षा व अभ्यासाच्या गोडीचे कौतुक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केले आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून बऱ्याच गोष्टी ऑनलाईन सुरू केल्या आहेत, परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक खेडेगावातील दुर्गम भागातील शाळेच्या ठिकाणी अशा कामांसाठी मोबाइलला नेटवर्क उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील शिक्षकांना शाळेपासून दूरवर जाऊन ही कामे आनलाईन करावी लागतात. तशातच जि.प.प्रा.शाळांतून मुलांच्या निपूण भारत या अंतर्गत परीक्षा होऊ घातल्या होत्या, परंतु अजूनही नेटवर्क नसलेल्या शाळांपैकी संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्रभागातील नारडुवे ही देखील शाळा आहे. या गावातील किंवा शाळेतील मुले निपूण भारत च्या परीक्षा देण्यावाचून वंचीत राहत होती. ही गोष्ट अनुभवी व तेवढेच बुद्धीमान असलेले केंद्र प्रमुख दत्ताराम गोताड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेथे जाऊन थेट मुलांची परीक्षा झाडाला बांधलेल्या माचावर घेऊन मुलांच्या चेह-यावरील आनंद फुलवला आणि प्रशासकीय कामातही महत्वाचे योगदान दिले.
नारडुवे सडेवाडी शाळेत मोबाईलला नेटवर्क नाही व ही परीक्षा दुसऱ्या गावात जाऊन देण्यासाठी मुलांना गावाबाहेर पाठवायला पालक तयार नाहीत, अशी स्थिती असताना या ग्रामीण भागात, माखजन, धामापूर, कासे केंद्राचे केंद्रप्रमुख असलेले दत्ताराम लक्ष्मण गोताड हे या शाळेत पोहचले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काहीही झाल तरी निपुण भारतची ऑनलाईन परीक्षा द्यायची विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा आणि काहीही झाल तरी विद्यार्थ्यांना वंचित ठेवायचं नाही हा केंद्रप्रमुखांचा संकल्प होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सदानंद जोगळे नावाच्या विद्यार्थ्याने भीत भीत विचारले.. साहेब, तुम्हाला झाडावर चढता येत का? ५७ वर्षे वयाच्या केंद्रप्रमुखांनी पटकन हो म्हटलं. विद्यार्थी म्हणाला, मग साहेब सोप्प आहे. डोंगरात एका ठिकाणी झाडावर माचण बांधलेली आहे. त्या माचावर मोबाईलला रेंज येते. तिथे कॉलेजची मुले बसतात. केंद्रप्रमुखांनी विचार केला की, आपण या मुलांना तिथे घेऊन गेलो तर?
लगेच केंद्रप्रमुख शाळेतील सात विद्यार्थ्यांना घेऊन पायपीट करून माचा पर्यंत पोहचले. मुलांना एक एक करून वर चढवून स्वतः माचावर पोहचले. मोबाईल नेटवर्क आल्याने विदयार्थ्यांच्या आणि पर्यायाने केंद्रप्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आली होती. मिळालेल्या मोबाइल नेटवर्कमुळे निपुण भारतची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली व विद्यार्थी यशस्वी झाले. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या म्हणीचा प्रत्यय मुलांना माचावर परिक्षा देवून आला. माचावर पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा केंद्रप्रमुख यांनी सदानंद जोगळे याची सर्वप्रथम परीक्षा घेतली व त्याने सर्व स्तर प्राप्त केले.सर्वच विद्यार्थी यशस्वी झाल्याने ५७ वर्षांमध्ये आलेला सर्वोत्तम अनुभव असल्याचे केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी सांगितले.
जवळच्या चार झाडावर उंचावर बांबूच्या सहाय्याने माचण बांधली जाते. वरती बसण्यासाठी कामट्या वापरून माच केला जातो. या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना माचावर चढण्यासाठी शिडी लावण्यात आली होती.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेऊन धीर देणारे शिक्षक, केंद्र प्रमुख व अधिकारी असतील तर विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. हे मात्र खर! केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांचा आदर्श खर तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी घ्यायला हवा.
तांत्रिकदृष्टया अशक्य असणारी गोष्ट या केंद्रप्रमुखांनी आपल्या कौशल्याने सोडवून विद्यार्थी वर्गाला आनंद मिळवून दिला. अशक्य ते शक्य केल्याने दत्ताराम गोताड यांच्या या कृतीचे कौतुक नुसते केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता याची दखल थेट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (स्टेट कौन्सील ऑफ इज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) पुणे यांनी घेतली असून दत्ताराम गोताड यांच्या या कृतीचे कौतुक व अभिनंदन केले आहे.