सांगली : सांगलीतून एक वर्षाच्या बाळाचे अपहरण करून कोकणात विक्री करणाऱ्या इम्तियाज पठाण व वासिमा पठाण या पती-पत्नीला विश्रामबाग पोलिसांनी कराडमधून अटक केली. अपहरणनाट्यातील मुख्य सूत्रधार असलेले पती-पत्नी गेले पंधरा दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पहाटे म्हणजेच दि. २१ ऑक्टोबर रोजी विश्रामबाग चौकात पदपथावर झोपलेल्या एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्याची घटना घडली होती.
रस्त्यावर फुगे विकणाऱ्या विक्रम पुष्पचंद बागरी यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर तीन दिवसांनी अपहृत बालकाला सावर्डे (जि. रत्नागिरी) येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी मातेच्या हवाली केले. या वेळी इनायत गोलंदाज (रा. मिरज) याला अटक करण्यात आली होती. मात्र, या अपहरणनाट्यातील सूत्रधार असलेले पती-पत्नी फरार होते.
गेले पंधरा दिवस पोलीस त्या दोघांचा शोध घेत असताना इम्तियाज पठाण व वासिमा पठाण यांना कराडमधून ताब्यात घेऊन सोमवारी अटक करण्यात आली. या दोघांनी सांगलीत दोन ठिकाणी मूल पळवण्याचा प्रयत्न केला होता. एके ठिकाणी त्यांचा पाठलागही करण्यात आला होता. तर, सांगली-मिरज रस्त्यावरील बेघर वसाहतीमधूनही बालकाचे अपहरण करण्याचा त्या दोघांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. तथापि, दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विश्रामबाग चौकामध्ये दुभाजकाच्या खुल्या जागेत झोपलेल्या बालकाचे अपहरण करण्यात ते यशस्वी ठरले.
मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याला अंघोळ आणि चांगले कपडे घालून सावर्डे (जि. रत्नागिरी) येथील सचिन राजेशिर्के याच्या ताब्यात देण्यात आले. त्या बदल्यात १ लाख ८० हजार रुपये घेण्यात आले. उर्वरित पाच लाखांची रक्कम कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर देण्याचे ठरले होते. अपहरण करण्यात आलेल्या मुलाची दिवाळीच्या मुहूर्तावर विक्री करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही गुरुवारअखेर पोलीस कोठडी सुनावली.
