सांगली : सांगली-मिरजेसह तासगाव परिसरात शुक्रवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने पेरणी झालेल्या रब्बी हंगामास दिलासा मिळाला असला, तरी काढणीला आलेल्या भुईमूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ऑक्टोबर महिना समाप्त होत आला, तरी थंडी सुरू होण्याऐवजी पावसाचा मुक्काम कायम असल्याने द्राक्ष बागायतदार चिंंतेत आहेत.

दिवाळी सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. खंडित स्वरूपात हा पाऊस होत असल्याने आणि प्रमाण कमी असल्याने फारसे नुकसानकारक नव्हते. मात्र, शुक्रवारी दुपारपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात झाला.

पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत होते. रस्त्यांवरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागत होते. सांगलीतील स्टेशन रोड, राजवाडा चौकात रस्त्यावर पाणी साचले होते, तर मिरजेत तांदूळ मार्केट, मंगल चित्रमंदिर परिसरातील रस्त्यावर एक फुटाने पाणी वाहत होते. मैदान दत्त मंदिर चौकामध्ये बराच काळ पावसाचे पाणी साचून राहिले होते.

दरम्यान, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, द्राक्ष पट्ट्यातही चांगला पाऊस झाला आहे. पावसाने द्राक्ष बागामध्ये पाणी साचले असून, गोडी छाटणी झालेल्या द्राक्ष बागामधून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. पावसाने भुरी, दावण्या या रोगाचा उपद्रव वाढणार असल्याने द्राक्षउत्पादक धास्तावले आहेत.

रब्बीसाठी लाभदायी

जिरायत शेतामध्ये शाळू, करडई, हरभरा या रब्बी पिकांची पेरणी काही शेतकऱ्यांनी आटोपली असून, शेतातील पिके आता उगवली आहेत. या पिकांना आज झालेला पाऊस लाभदायी ठरला आहे. कोळपणीच्या अवस्थेत असलेल्या शाळू पिकासाठी अवेळी झालेला पाऊस पीकवाढीसाठी पोषक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तर, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रानांत नीर लागले असल्याने रब्बी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच आज पुन्हा पाऊस झाल्याने शाळूपेरणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. तर, खरीप हंगामातील मागास भुईमूग, ज्वारी, बाजरी अद्याप उभे असल्याने पावसाने नुकसान होणार आहे. भुईमुगाला कोंब फुटण्याची, तर ज्वारी, बाजरी काळी पडण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.