सांंगली : धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या ४८ तासाहून अधिक काळ मुसळधार पाउस पडत असल्याने वारणेचे पाणी यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा पात्राबाहेर पडले आहे. सांगली, कोल्हापूरला निर्माण होत असलेला महापुराचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून शनिवारी दुपारपासून १ लाख क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला असून रविवारी पावसाचा अंदाज घेऊन यामध्ये वाढ करण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णा व उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे नदीतील पाणी पातळी वाढत आहे. गेल्या २४ तासात कृष्णेतील पाणी पातळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ २ फूट ९ इंचाने वाढून १५ फूट झाली आहे. यामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. आज दिवसभर सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात संततधार पाऊस पडत होता.

हेही वाचा – सातारा : औषधांच्या नावाखालील बनावट ८७ लाखांची मद्यतस्करी पकडली

शिराळा तालुक्यात संततधार पाउस सुरू असल्याने वारणा, मोरणा नद्या दुथडी भरून वाहत असून वारणेचे पाणी दुसर्‍यांदा मळी रानात शिरले आहे. मांगले, सावर्डै पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली धरणाच्या परिसरात ६० मिलीमीटर पाऊस झाला तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे ८५ महाबळेश्‍वरमध्ये ९५ आणि नवजा येथे १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. चांदोलीत २३.५४ तर कोयनेत ५०.७७ टीएमसी जलसंचय झाला आहे. दरम्यान, पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा, वारणा आणि घटप्रभा या नद्यातील पाणी पातळी संततधार पावसाने वाढत असून कोल्हापूर, सांगलीला संभाव्य महापुराचा निर्माण झालेला धोका सौम्य करण्यासाठी अलमट्टी धरणातून आज दुपारी दीड वाजल्यापासून १ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. या धरणात आज सकाळी पाण्याची आवक ६५ हजार ४८० क्युसेक होती, तर विसर्ग ६५ हजार क्युसेक होता. यामध्ये ३५ हजार क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. १२३ टीएमसी क्षमतेच्या अलमट्टीमध्ये आज सकाळचा जलसाठा ९७.४२ टीएमसी होता.

हेही वाचा – Sharad Pawar on Atul Benke : ‘कोण अतुल बेनके?’, अवघ्या तासाभरात शरद पवारांनी विधान बदलले; म्हणाले, “राजकारणात फडतूस..”

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे. मिरज ८.२, जत ०.८, खानापूर-विटा १.५, वाळवा-इस्लामपूर १७.१, तासगाव ४.१, आटपाडी ०.३, कवठेमहांकाळ २, पलूस १३.५ आणि कडेगाव ५.८ मिलीमीटर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli rain continues in the western ghats release of 1 lakh cusecs from almatti dam to prevent flood risk ssb