सांगली : यंदाच्या हंगामात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी मृगाचा पेरा केवळ ३५ टक्केच झाला आहे. मे महिन्यात सरासरीच्या पाच पट पाऊस झाला, ओढे-नाले दुथडी भरून वाहते झाले. जून महिन्यातही पावसाने सरासरी गाठल्याने जमिनीत अद्याप ओल टिकून असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी दोन लाख ४६ हजार ६१८ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी आज अखेर ८४ हजार ८३६.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के पेरणी झालेले क्षेत्र आहे. जत तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के पेरणी झाली आहे. यावर्षी सोयाबीन पिकाखालील क्षेत्र घटण्याची चिन्हे आहेत. कारण पश्चिम भागात आगाप सोयाबीन पेरणीच्या वेळीच मुसळधार पाऊस सुरू होता.

जूनमध्ये ७ जूननंतर पेरणीचा हंगाम सुरू होतो. तोपर्यंत मान्सूनपूर्व पावसाने पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपतात. मात्र, या वर्षी १८ मे पासून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मशागत करताच आली नाही. आजही पाणस्थळ जमिनीत पाणी साचून राहिले आहे. यामुळे पेरणीच करता येत नाही, अशी स्थिती आहे.

कृषी विभागाने पेरणी करण्यास घाई करू नये, असा सल्ला दिला होता. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर आठ दिवसांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर १५ जूनपासून काही भागात पेरणीची कामे सुरू करण्यात आली. आजअखेर जिल्ह्यात पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारीनुसार असे आहे. – भात २०.१०, ज्वारी २.८२, बाजरी ५९.९५, मका ४०.३९, कडधान्ये ४९.७२ आणि भूईमूग २१.१४ टक्के.

जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांत पेरणीला गती आहे. मात्र, गाळवट जमीन असलेल्या वाळवा, शिराळा या तालुक्यात पेरणीसाठी घातच मिळाली नसल्याने पेरणी रखडली आहे. तालुकानिहाय पेरणी झालेली टक्केवारी अशी- मिरज २१.३७, जत ७५.३१, खानापूर ०.९६, वाळवा २२, तासगाव ३.५३, शिराळा १९.६३, आटपाडी १२.१९, कवठेमहांकाळ ५६.५३, पलूस २३.६२ आणि कडेगाव १२.९४ टक्के.