मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे भाजपाचं स्थान हे धुळीस मिळालं आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली होती. याला शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“एकनाथ शिंदेंमुळे शिवसेना आणि भाजपाला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली आहे. महाराष्ट्राला महायुतीचं सरकार मिळालं आहे. सरकार कायदेशीर काम करत आहे. संजय राऊत कुठल्या घटनेच्या आधारावर बोलतात माहिती नाही. एखाद्या वकीलाकडं जाऊन राऊतांनी शिकवणी लावावी,” असा टोला संजय गायकवाडांनी लगावला आहे.
हेही वाचा : “कृषिमंत्री असताना काय केले?” पंतप्रधान मोदींच्या विधानाला शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…
‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून दूर व्हावं लागेल. असा संदेश मोदी आणि शाहांनी दिला आहे,’ असेही संजय राऊत म्हणाले. याबद्दल संजय गायकवाडांनी म्हटलं, “सरकार जाणार, मुख्यमंत्री बदलणार अशी घोषणा वारंवार संजय राऊतांनी केल्या. पण, मोदी आणि शाहांनी एकनाथ शिंदेंवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.”
“एकनाथ शिंदेंचं भाषण पंतप्रधान मोदी ऐकतात. मुख्यमंत्र्यांची पाठ मोदी थोपटतात. हे संजय राऊतांना फुटक्या चष्म्यातून दिसत नाही,” अशी टीका गायकवाडांनी केली आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी तुमच्यावर टीका का करत आहेत? शरद पवार म्हणाले, “देशात…”
देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओवर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, “शिवसेना-भाजपा आणि अजित पवारांचा गट सरकारमध्ये पुन्हा येणार आहे. असा व्हिडीओचा अर्थ असू शकतो.”