Sanjay Raut on IND vs PAK Match Betting : शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आशिया चषक स्पर्धेत रविवारी (१४ सप्टेंबर) खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच या सामन्यावर लाखो कोटी रुपयांचा सट्टा लावला गेला होता असा दावा देखील त्यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, “हा सामना खेळवून केंद्र सरकारने पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात १.५ लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. यापैकी काही हजार कोटी पाकिस्तानला मिळाले आहेत.”

संजय राऊत म्हणाले, “क्रिकेटच्या मैदानावर कालची मॅच फिक्स होती. या सामन्यादरम्यान १.५ लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. कदाचित त्यातले काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील. कालच्या सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी रुपये मिळाले आहेत. काल मॅच फिक्सिंग करून जुगार खेळला गेला. त्यातले काही हजार कोटी रुपये पाकिस्तानला गेले आहेत.”

“मोदी सरकार पाकिस्तानला आमच्याविरोधात लढण्यासाठी सक्षम करतंय”

शिवसेनेचे (उबाठा) खासदार म्हणाले, “केंद्रातलं मोदी सरकार पाकिस्तानला आमच्याविरोधात लढण्यासाठी सक्षम करतंय. मोदी सरकार आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी पाकिस्तानला अर्थसहाय्य करतंय. यावर भाजपाने बोलावं. कालच्या सामन्यात पाकिस्तान जिंकला किंवा हरला याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण आम्ही कालच्या सामन्यावर थुंकलोय. आम्ही अशा सामन्यांवर थुंकतो.”

“आमच्या देशातील २५ महिलांचं कुंकू पुसून तुम्ही क्रिकेट खेळत बसलेले आहात. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? ज्यांनी आमच्या महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्याबरोबर क्रिकेट कसलं खेळताय?”

सुनील गावसकरांच्या वक्तव्याचा संदर्भत देत राऊतांची मोदी सरकारवर टीका

संजय राऊत म्हणाले, “माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी काल काय सांगितलं ते ऐकलंत का? ते म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघाची पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्याची इच्छा नसली तर सरकारने त्यांना खेळायला भाग पाडलं आहे. सरकारने परवानगी दिल्यामुळे त्यांना खेळावं लागतंय. केंद्र सरकारने परवानगी दिली नसतील तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता.’ सुनील गावसकरांसारखा टोलेजंग क्रिकेटपटू हे सांगतोय. याकडे आपण गांभीर्याने पाहायला हवं.”