Sanjay Raut on Sharad Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.”

यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का

“महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो”, असंही संजय राऊत म्हणाले.

ज्यांनी शिवसेना फोडली अशांना…

“ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, असंही संजय राऊत म्हणाले.

“दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. कोणाला कसेही सत्कार करतात. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोगाला प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीत दलाली करायला गेलात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करता? भाजपाचा हा उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार करता तुम्ही? हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. मलाही याचं आमंत्रण असून मी येथे जाणार आहे. जो मराठी माणूस आहे, तो जाणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut critisice sharad pawar over delhi program eknath shinde fecilated sgk