Sanjay Raut on Narendra Modi Retirement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर संघ मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांशी बातचीत केली. मोदींच्या या नागपूर भेटीनंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केलं होतं. मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातील असेल असं राऊत यांनी म्हटलं होतं. पाठोपाठ राऊत यांनी आज (२ एप्रिल) पंतप्रधान मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “७५ वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याचं वय ७५ वर्षे झाल्यानंतर त्याने सत्तेच्या पदावर राहू नये असा मोदींचा नियम आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना हा नियम लागू केला होता. मोदी आता या नियमापलिकडे आहेत का? मोदींनी जेव्हा हा नियम केला होता तेव्हा त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता होती. मोदी येत्या १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या नियमाबाबत, निवृत्तीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींना आमंत्रित केलं होतं.”

मोदींचं अवतारकार्य संपलंय : राऊत

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ती मोगली संस्कृती आहे, अशी कितीही वक्तव्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तरी त्यांना बोलू द्या. मात्र, मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय. अवतारकार्य संपलं की सर्वांनाच जावं लागतं. राम, कृष्ण आले आणि त्यांचं अवतारकार्य संपल्यावर निघून गेले. आता मोदींचं अवतारकार्य संपलंय, त्यांनाही निघून जावं लागेल.”

आडवाणींना बेदखल करून मोदी पंतप्रधान झाले होते : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ती मोगली संस्कृती आहे वगैरे, वगैरे… मात्र, औरंगजेबाने शहाजहानला कोंडून ठेवलं होतं, त्याचप्रमाणो मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि स्वतः पंतप्रधान झाले. मुळात लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीचा डोलारा उभा केला आहे. भारतीय जनता पार्टीला दोन खासदारांपासून सत्तेच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या लोकांनीच केलं आहे. आडवाणी यांनी अयोध्येचं आंदोलन केलं होतं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says narendra modi turning 75 will retire this year so rss invited him for discussion over his successor asc