आमदार अपात्रेप्रकरणी आज ( २५ सप्टेंबर ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना सूचक इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल. आज तुम्ही त्याचं उल्लंघन केलं आहे. पण, भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा : “नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत, कारण…”, अनिल परब यांचं विधान

संजय राऊत म्हणाले, “सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत. त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? एका राजकीय पक्षाचे नेते आहात आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलात हे मान्य. पण, शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल.”

“आज तुम्ही त्याचं उल्लंघन केलं आहे. मात्र, भविष्यात सरकार बदलतात आणि तुम्हाला किंमत मोजावी लागणार,” असा इशारा संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना दिला आहे.

हेही वाचा : “…तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे”, भाजपाचं थेट आव्हान

आजच्या सुनावणीत काय घडलं?

संजय शिरसाट म्हणाले, “आजच्या सुनावणीत प्रत्येक पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात प्रत्येक पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आली. ही सुनावणी कधी होणार, याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं व्हावी, असं अनेकांची म्हणणं आहे. याबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut warning rahul narwekar over mla disqulification ssa