देशभर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा आहे. बहुप्रतिक्षित असा क्षण काल २२ जानेवारी रोजी अयोध्येत साजरा झाला. ५०० वर्षानंतर राम आपल्या स्वगृही परतला अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केला. तसंच, देशातील विरोधी पक्षांनीही प्राणप्रतिष्ठेवरून आनंद व्यक्त केला असला तरीही या सोहळ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आज ते नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत बोलत होते.
“अयोध्येतून रामसुद्धा आपल्याला आशीर्वाद देत असतील. प्रभू रामांचा आशीर्वाद कोणाला मिळणार असेल तो शिवसेनेला मिळणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदींसारखे ढोंगी नेते देशात झाले नाहीत. २०१४ आणि २०१९ साली नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते. मोदींनी नाशिकला येऊन दोन्ही वेळेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याचं वचन दिलं होतं. पण त्याचं काय झालं? तेच मोदी परवा काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाला दिसले. तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही झाडू नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत.”
हेही वाचा >> “एकनाथ शिंदे ज्यांच्याबरोबर बसलेत त्यांच्या लंकेचं दहन होईल आणि त्यात बेईमान…”, संजय राऊत यांची बोचरी टीका
उपवासाची नाटकी कसली करता?
“अयोध्येतील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा त्यांनी केली. गेले ११ दिवस व्रतवैकल्य केले. ११ दिवस मंदिरात ब्लँकेटवर झोपले. देशातील ४० कोटी जनता फुटपाथवर रोजच झोपतेय, त्यांच्याकडे लक्ष द्या. ढोंग कसले करताय? देशातील ८० कोटी जनता उपाशी आहे, तुम्ही उपवासाची नाटकी कसली करताय?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.
नरेंद्र मोदींचे मगरीचे अश्रू
“प्रभू श्रीराम मंदिरात गेले, यासाठी मोठा संघर्ष झाला. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद आहे. फक्त एकच माणूस या देशात रडला, ते म्हणजे नरेंद्र मोदी. मूर्तीकडे पाहून ढसाढसा रडले. आनंदाचा क्षण आहे, रडताय काय? निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. पुलवामामध्ये ४० जवानांची हत्या झाली. तेव्हा यांच्या डोळ्यांत अश्रू आले नाहीत. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा टीपूस आला नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले नाहीत. महिलांवर बलात्कार होत आहेत, तेव्हा यांच्या डोळ्यांत अश्रू आले नाहीत. पण निवडणुका आल्या की हे महाशय डोळ्यांतून अश्रू गाळून ढसाढसा रडतात. हे मगरीचे अश्रू आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंची रामाशी तर मोदींची रावणाशी तुलना; संजय राऊत म्हणाले, “रावणाच्याच पैशानं त्याची लंका…!”
“देशातील भ्रष्टाचार पाहून अश्रू येत नाहीत. पण रामाची मूर्ती पाहून अश्रू येतात. मला वाटतं रामाने डोळे वटारून पाहिलं असेल की तुम्ही का आलात म्हणून. रामाचं राज्य अयोध्येत येत असताना या महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य आलं. म्हणूनच एकच घोषणा देतो. तख्त बदल दो. राज बदल दो. गद्दारांको राज उखाड दो. याप्रकारचा संदेश घेऊन जायचं आहे. राम मंदिराच्या निमित्ताने घराघरात अक्षता वाटल्या. अक्षता कसल्या वाटता, आमचे १५ लाख रुपये वाटा. तर तुमच्या अक्षतांचा सन्मान केला असता”, असंही संजय राऊत म्हणाले.
मोदी ठाकरेंना आणि शेतकऱ्यांना घाबरतात
“या महाराष्ट्रात नव्हे तर देशात, मोदी फक्त दोघांना घाबरतात. ते म्हणजे शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना. बाकी मोदी कोणाला घाबरणार नाहीत. संपूर्ण शेतकरी, कष्टकरी ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. परवा मोदी नाशिकमध्ये आले. आणि काय केलं? तर, शेतकऱ्यांना अटक केली. शेतकरी नेत्यांना नजर कैदेत ठेवलं. शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही. अशाप्रकारचं महाराष्ट्रातील जुलमी राज्य उलथवून टाकलं पाहिजे”, असाही हल्लाबोल संजय राऊतांनी केला.