आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात तिसरी आघाडी तयार करण्याचे संकेत आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत. त्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, आता शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनीही बच्चू कडूंच्या या विधानावर भाष्य केलं आहे.
संजय शिरसाट यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत केलेल्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांची अनेक कामे केली असून तरीही त्यांना तिसरी आघाडी तयारी करायची असेल, तर तो त्यांचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा- “चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळतं का?”, भास्कर जाधव सभागृहात संतापले; नेमकं काय घडलं?
नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?
“निवडणुकीच्या काळात अपक्षांना त्यांचं अस्तित्व दाखवायचं असतं. पाच वर्षात आपली ताकद वाढली आणि आपण तिसरी आघाडी तयार करू शकतो, असं त्यांना वाटत असेल, तर ते तसा निर्णय घेऊ शकतात. खरं तर तिसरी आघाडी म्हणजे केवळ एक दबाव गट तयार करण्याचा हा प्रयत्न असतो, अशा प्रकारे आघाडी करून सरकार स्थापन करता येत नाही”, असं संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाल्यास, त्याचा फटका महायुतीला बसू शकतो का? असं विचारलं असता, “तिसऱ्या आघाडीमुळे महायुतीचे कोणतेही नुकसान होणार नाही. निवडणुकीत असे छोटे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याकडे लोकशाही आहे, त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“मागील पाच वर्षातील पहिली अडीच वर्ष सोडली, तर पुढच्या अडीच वर्षात एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांची शेतकरी आणि दिव्यांगांसंदर्भातील बरीच कामे केली आहेत. हे बच्चू कडू यांनाही माहिती आहे. इतकी काम केल्यानंतरही त्यांना महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी तयार करायची असेल, तर तो त्यांचा विषय आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘इतर पक्षात सन्मान नाही’, वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंची मनसेवर टीका…
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले होते?
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत दिले होते. “रविकांत तुपकर, संभाजी राजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण एकत्र येऊन शेतकरी, शेतमजूरांसाठी लढलं पाहिजे. त्यासंदर्भात आत्तातरी पूर्ण चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ ”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती.
© IE Online Media Services (P) Ltd