सातारा: साताऱ्यात २१ हजार जणांनी पुसला असाक्षरतेचा कलंक. देश पातळीवर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने (एनआयओएस) २३ मार्च २०२५ रोजी घेतलेल्या उल्लास (नव भारत साक्षरता अभियान) परीक्षेचा महाराष्ट्र राज्याचा निकाल १० जुलै रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६३ टक्के, तर सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे.
मागील दोन वर्षांत सातारा विभाग ‘उल्लास’मध्ये पिछाडीवर होता. राज्य योजना कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे विभागाने उल्लासमधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसविण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट (लक्ष्य) ओलांडले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांची, तर तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सातारा जिल्ह्यास १६,२५५ नोंदणीचे व १८,०५० परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोंदणी २२,४५१ इतकी झाली. तर परीक्षेस २१,७२० इतके बसले. त्यांपैकी २१,५८२ इतके उत्तीर्ण झाले. केवळ १३८ असाक्षरांना सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, योजना शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी अभिनंदन केले आहे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल एनआयओएसच्या https://www.www.nios.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहे. उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र जिल्हा योजना शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत यथावकाश देण्यात येणार आहे.
‘उल्लास’ योजनेने आता सर्वत्र गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.- राजेश क्षीरसागर, विभागीय समन्वयक, उल्लास तथा विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ