सातारा : सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर घाटच्या २१ किमी लांबीच्या स्पर्धेत पुरुषांमध्ये सांगलीच्या अंकुश लक्ष्मण हाके याने तर महिलांमध्ये साताऱ्याच्या साक्षी जाड्याळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. चौदाव्या वर्षांत पोहोचलेल्या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत सातारा जिल्ह्यासह देशभरातून आलेल्या साडेआठ हजार स्पर्धकांनी आरोग्यपूर्ण धाव घेतली. यवतेश्वरच्या घाटातून टप्प्याटप्प्याने पुढे सरकणारे स्पर्धक हे मनोहरी दृश्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक उठावदार ठरले. टप्प्याटप्प्यावर उत्साह वाढवणारे सातारकर आणि मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी होणारी स्पर्धकांची धाव अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये यंदाची मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.
येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी सातारा रनर फाउंडेशनचे सर्व संयोजक उपस्थित होते. सकाळच्या कुंदवातावरणामध्ये टी-शर्ट रेसिंग ट्रॅक शूज अशा परफेक्ट मॅरेथॉन किटमध्ये प्रत्येक स्पर्धक हजारोंच्या संख्येने दिसून आले. हलक्याशा व्यायामानंतर झेंडा दाखविल्यानंतर स्पर्धकांनी पोलीस कवायत मैदान, पोवई नाका, शाहू चौक केसरकर पेठ आदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर चौक तेथून बोगदा व यवतेश्वरच्या सहा किलोमीटरच्या घाट टप्प्यातून पुढे प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे पाचशे मीटर जाऊन पुन्हा माघारी परतण्याचा ठरवण्यात आला होता. हजारो स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जोरदार धाव घेतली. या स्पर्धेला सातारकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.
स्पर्धकांच्या सोयीसाठी प्रत्येक एक किलोमीटरच्या टप्प्यावर संयोजकांनी तात्पुरते सपोर्ट सेंटर उभे केले होते, तसेच सातारकर आणि आबाल वृद्ध मॅरेथॉनच्या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. यवतेश्वर घाटामध्ये हजारो स्पर्धकांचा जत्था टप्प्याटप्प्याने पुढे सरकत होता. पोलिसांनी तैनात केलेल्या काही ड्रोन कॅमेऱ्याने ही मनोहरी दृश्य टिपली. महिला, पुरुष सर्व स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा देशभरात वेगळी आहे, याचाच जणू परिचय दिला. या स्पर्धेची नोंद, घाटाचा नैसर्गिक चढ तसेच येथील वातावरण आणि खेळाडूंचा मिळणारा प्रतिसाद यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
पुरुषांमध्ये पहिला क्रमांक सांगलीच्या अंकुश लक्ष्मण हाके याने एक तास दहा मिनिट आठ सेकंदात तर महिलांमध्ये साताऱ्याच्या साक्षी जाड्याळ हिने एक तास एकोणतीस मिनिट पस्तीस सेकंदात अंतर पार करत पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : पुरुष- अंकुश लक्ष्मण हाके प्रथम – एक तास १० मिनिट ८ सेकंद, लव्हप्रित सिंग (द्वितीय) – एक तास ११ मिनिट सहा सेंकद, धर्मेंद्र डी.(तृतीय) एक तास १२ मिनिट ३ सेंकद.
महिला – साक्षी जाड्याळ (प्रथम) – एक तास २९ मिनिट ३५ सेकंद , रुतुजा पाटील (द्वितीय)- एक तास ३० मिनिट ५२ सेकंद
सोनाली देसाई (तृतीय) एक तास ३३ मिनिट ४२ सेकंद.