सातारा : परळी खोऱ्यात (ता. सातारा) येथे सध्या पावसाचा मोठा जोर आहे. पावसाने ओढे, नाले वाहू लागले आहेत. परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावर वन हद्दीतील मातीचा भराव, तसेच निलगिरीची झाडे उन्मळून पडली आहेत.
कुरळबाजी डोंगर खचू लागला आहे. निलगिरीची झाडे उन्मळली. जमीन खचून माेठा भराव शेतात वाहून आला आहे. येथील मातीचा भराव वन हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतात येऊ लागला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
मे महिन्याचा अवकाळी पाऊस, तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचा जोर असल्याने या परिसरात अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हा डोंगर खचत असल्यामुळे कुरळबाजी येथील वन हद्दीच्या खाली असलेल्या जगन्नाथ कुरळे, शंकर कुरळे, आनंद कुरळे यांच्या शेतीत मातीचा भराव वाहून येऊ लागला आहे. सततच्या पावसामुळे परिसरात पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र, डोंगर हिरवे झाल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.