सातारा : सातारा-लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ खासगी बस व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले. या अपघातात चालक सलमान इम्तियाज सय्यद (मालगाव, पाटील गल्ली, शिरढोण, ता. शिरोळ, कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (पेठ वडगाव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक छोट्या खासगी आराम बसमधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना हा अपघात झाला.
या अपघातात बसचालक आणि एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली होती. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की इचलकरंजी येथील खासगी आराम बस भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशनमार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा हा ट्रक सालपे गावच्या हद्दीत एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच, लोणंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. या अपघाताची नोंद लोणंद (ता. खंडाळा) पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.