सावंतवाडी : आजगाव येथील डीएड कॉलेजजवळच्या वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मुसळधार पाऊस सुरू असतानाही स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य राबवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजीकडे जाणारी (एमएच २० बीएल ३९३४) आणि सावंतवाडीहून शिरोड्याकडे जाणारी (एमएच १४ बीटी २०१२) या दोन एसटी बसेसमध्ये हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही बसचे चालक जखमी झाले असून, सावंतवाडी-शिरोडा बसचे चालक एस. एम. दर्शन आणि वेंगुर्ले-पणजी बसचे चालक एम. के. दाभोलकर यांचा यात समावेश आहे. यापैकी एका चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. सावंतवाडी-शिरोडा बसचे वाहक आर. एस. कांबळी आणि वेंगुर्ले-पणजी बसचे वाहक पी. एस. जाधव हेदेखील या अपघातात सहभागी होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असले तरी, स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करत जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना तातडीने रिक्षा आणि उपलब्ध असलेल्या इतर वाहनांच्या मदतीने मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दशरथ सीताराम राऊळ (वय ७५, रा. सातार्डा) आणि सुमित्रा दशरथ राऊळ (वय ६८, रा. सातार्डा) या चार जखमींवर मळेवाड आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या मदतकार्यात स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवाडकर, अशोक रेवाडकर, गणेश रेवाडकर, आनंद कळसुलकर, शुभम परब, सूर्या पांढरे, सुनील आजगावकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी मोलाचा वाटा उचलला. विशेष बाब म्हणजे, अपघातस्थळी एसटीचे अधिकारी किंवा पोलीस उशिरापर्यंत दाखल झाले नव्हते. स्थानिकांनीच पुढाकार घेऊन जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून दिली, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.