सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकात अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्य रस्त्यावर लिंबाला टाचण्या टोचून, नारळ, हळद आणि कुंकू ठेवल्याचे आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी आपली दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
भानामतीचा संशय
आज सकाळी गांधी चौकात काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता, त्यांना रस्त्याच्या मधोमध नारळ, हळद, कुंकू आणि टाचण्या टोचलेले लिंबू दिसले. हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि हा प्रकार भानामतीचा असल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी
या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून, हे अघोरी कृत्य कोणी केले याचा शोध सुरू आहे. अंधश्रद्धा पसरवणारे आणि भीती निर्माण करणारे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात गैरसमज आणि भीती पसरते, त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, असे सांगण्यात आले.