सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील माठेवाड येथील रहिवासी पराग चव्हाण यांनी आपली पत्नी प्रिया चव्हाण हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे योग्य तपास होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जर या प्रकरणात त्यांना न्याय मिळाला नाही, तर आपल्या लहान मुलींसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

​पराग चव्हाण यांच्या पत्नी, प्रिया चव्हाण, यांचा मृतदेह ४ जुलै २०२५ रोजी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी, नातेवाईकांनी सांगितले की मानसिक छळामुळे ती प्रचंड दबावाखाली होती आणि त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. प्रियाच्या आई-वडिलांनी या प्रकरणाबद्दल पोलिसांना सविस्तर माहिती दिली होती, नंतर पराग चव्हाण यांनीही पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे.

पराग चव्हाण यांच्या मते, पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीत. तपास यंत्रणेवर नेमका कोणाचा राजकीय दबाव आहे, हे त्यांना माहीत नाही. यामुळे तपास निष्पक्ष होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे, आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेसाठी कमी आणि आरोपींसाठी जास्त काम करतात, असे विधानही त्यांनी केले. आपल्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे हे प्रकरण मांडणार आहेत. जर या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना न्याय मिळाला नाही, तर अखेरचा उपाय म्हणून ते पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.