अहिल्यानगर:शहरातील कचरा संकलन व्यवस्थेतील अडचणींची गंभीर दखल घेतली आहे, सध्या कार्यरत कचरा संकलन एजन्सीच्या कार्यक्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ही एजन्सी हटवून नव्या एजन्सीकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपवली जाईल, नवीन एजन्सीसोबत कामकाजाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच नियमित, वेळेवर, यंत्रबद्ध कचरा संकलन सुरू होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त तसा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी आज, शनिवारी पाईपलाइन रस्ता, पद्मानगर परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान नागरिकांनी कचरा संकलन होत नसल्याने जागोजागी ठिग निर्माण झाले आहेत. त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असल्याच्या तक्रारी केल्या. आयुक्त डांगे यांनी या परिस्थितीची पाहणी केली.
मनपाने स्वच्छतेसंबंधित ठोस पावले उचलावी व घरोघरी घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन करावे, अशी मागणी महिलांनी केली. त्याला प्रतिसाद देताना आयुक्त डांगे यांनी कचरा संकलन एजन्सी बदलण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी कचरा संकलन होत नसल्याने मनपाने गेल्या तीन महिन्यांचा कचरा संकलन कर घेऊ नये, मनपाकडून कचऱ्या संदर्भात कोणत्याही सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली.
कचरा टाकायचा कुठे, महिलांचा आयुक्तांना प्रश्न
गेल्या तीन महिन्यांपासून कचरा संकलन होत नाही, घंटागाडी येत नाही. रस्त्यावर ढीग साचले आहेत, दुर्गंधी पसरली आहे. कचरा घरात साठवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा कचरा टाकायचा कुठे, अशा प्रश्नाचा भडिमार महिलांनी आयुक्त डांगे यांच्याकडे केला.