अहिल्यानगर: शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी केलेली असतानाही शहरात घुसलेल्या भरधाव वेगातील कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या सात मोटारींना जोरदार धडक दिल्याने, या वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात वाहन चालक असलेला शिक्षक जखमी झाला.
अपघात शहरातील नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील डीएसपी चौकात रात्री अकराच्या सुमारास घडला. कंटेनरचा चालक जगप्रित कश्मीरसिंह (रा. बाटला, पंजाब) याला नागरिकांनी पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सागर दिनकर चिकणे (वय ३१, रा. शिरूर, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यरात्री एकनंतर वाहतूक सुरळीत झाली. वाहनचालक जगप्रीत कश्मीरसिंह याने, आपल्याला झोप लागल्याने अपघात घडल्याची माहिती दिल्याचे कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सांगितले.
सागर चिकणी हे आपल्या मोटार (एमएच १२ एक्सएच ९६३८) कारमधून जात होते. छत्रपती संभाजीनगर रस्त्याने आलेल्या भरधाव कंटेनरने (एचआर-५५ एएल ८७०४) चिकने यांच्या मोटारला समोरून जोरदार धडक दिली तसेच, इतर सहा वाहनांचेही नुकसान झाले. त्यामध्ये इनोव्हा क्रिस्टा (एमएच ४२ एआर ३३१४), होंडा डब्ल्यूआरव्ही (एमएच १६ सीक्यू ३२२७), हुंडई आय २० (एमएच १६ एटी २९७०), हुंडई व्हर्ना (एमएच १६ बीएच ७०८१), बीएमडब्ल्यू (एमएच ०४ जीई ०४५६) आणि हुंडई क्रेटा (एमएच १६ डीजी ८३५६) या वाहनांचा समावेश आहे. इतर काही चारचाकी वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले.
सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस अंमलदार इस्राईल पठाण करत आहेत. शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांना जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे तसेच बाह्यवळण रस्ता सुस्थितीत असतानाही अवजड वाहने शहरात घुसतात. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या अपघातात काहींचे बळी गेले आहेत. शहरात अवजड वाहने येऊ नयेत. ते बाह्यवळण रस्त्यानेच जावेत यासाठी तेथे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तरीही छत्रपती संभाजीनगर रस्त्याने अवजड कंटेनर शहरात घुसला होता.