कराड : समस्त धनगर समाजाच्या मागण्या अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या असून, यापूर्वी धनगर समाज झुलवला गेला. त्यांच्या मतांचा गैरवापर झाला. धनगर समाजाच्या जमिनी कवडीमोल किमतीत लाटल्या गेल्या. पण, आज हा दिवस ऐतिहासिक असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक ही केवळ वास्तू नव्हे, तर समाजाच्या आत्मगौरवाचे प्रतीकच असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कराड ते चिपळूण रस्त्यावर पाटणजवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राहुल अहिरे, अभियंता संतोष रोकडे, लक्ष्मण येडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शंभूराज देसाई म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संकुलातून समाजाला शिक्षण, संस्कृती अन् सामाजिक प्रगतीसाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे. हा एकूणच प्रकल्प सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. भविष्यात पाटण तालुक्यातील धनगर समाजाचा विकास यामुळे निश्चितपणे गतिमान होईल.

माझे समर्थक आणि निष्ठावंत असणाऱ्या मागोजी शेळके यांच्यावर समाजाने माझी साथ सोडण्यासाठी दबाव टाकला होता. प्रसंगी त्यांना वाळीत टाकण्याचे कृत्यही केले गेले. तरीही भागोजी शेळके यांनी माझ्यावरील निष्ठा ढळू दिली नाही, निष्ठा काय असते, हे त्यांनी दाखवून दिले असल्याचे सांगत, शंभूराज देसाई यांनी भागोजी शेळके यांचा गुणगौरव केला.

विकासाला नवी दिशा मिळेल

धनगर समाजातील अनेकांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या या ऐतिहासिक क्षणाने धनगर समाजातील अभिमान, उत्साह आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव झळकला आहे. स्मारक व बहुउद्देशीय संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला वेग मिळणार असून, पाटण तालुक्यातील हा ऐतिहासिक प्रकल्प धनगर समाजाच्या विकासाला नवी दिशा देईल.

अनेक दशकांची मागणी मार्गी लागल्याचे समाधान

पाटण तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक असावे, अशी धनगर समाजाची अनेक दशकांपासून आग्रही मागणी होती. मात्र, यापूर्वी या मागणीसंदर्भात धनगर समाजाला झुलवत ठेवण्यात आले. याची दाखल घेऊन साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धनगर समाजाच्या भावनांचा मान राखला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारक उभारणीचे ऐतिहासिक कार्य तळमळीने साधले असल्याची भावना धनगर समाजबांधवांनी या वेळी व्यक्त केली.