कराड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. तरी, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. सर्व निकष, नियम बाजूला ठेवून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. आंदोलकांना मराठा बांधव म्हणून केलेली मदत, हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

कराडमध्ये मराठा बांधवांकडून झालेल्या सत्कारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. मे महिन्यापासून पिके वाया गेली आहेत. १ हजार ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा स्थितीत सरकारने जर कर्जमाफी दिली नाही तर, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.

महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृत राजकारणाची. मात्र, अलीकडे थोर व्यक्तिमत्त्वांचा अपमान करण्याचे धाडस सरकारमधील काही लोक सातत्याने करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना निक्षून दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार विरोधात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जर त्याला क्रांतीचे रूप दिले, तर निश्चितपणे बदल घडेल असा सूचक इशारा शिंदे यांनी राज्यकर्त्यांना दिला.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, आंदोलकांना निवास व सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कर्तव्य म्हणून पार पाडली. सरकारने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही व्यापक सहभागामुळे आंदोलन यशस्वी ठरल्याचे शिंदे म्हणाले. छगन भुजबळांवर टीका करताना शिंदे म्हणाले, भाजप काही लोकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आणि इतर मागास प्रवर्गाबाबत सरकारने दिलेली स्क्रिप्ट वाचून दोन समाजांत दरी पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. एकूणच सरकारची आरक्षणासंदर्भातील नेमकी भूमिका काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.