एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला आज ( २० जून ) एक वर्ष पूर्ण झाले. लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल. पण, अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे अनेक आमदारांनी वेळोवेळो नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे. “मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“कुठं दु:ख, तर कुठं सुख आहे. सर्वच गोष्टी पूर्ण झाल्यात असं नाही. एकनाथ शिंदे यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. दिव्यांग मंत्रालय, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. शेतकऱ्यांना पहिल्यांदा २ हजार कोटी नंतर १५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. १५ ते २० वर्षाच्या काळात नुकसान भरपाईची सर्वात जास्त मदत या सरकारच्या काळात दिली आहे,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

हेही वाचा : “नोटीस आल्यावर मोदींची भेट घेतली”, एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज…”

“५० आमदारांच्या योगदानाचा भाजपाला विसर”

“५० आमदारांची गळचेपी झाली आहे. विरोधक खोके घेतले म्हणून सांगतात. भाजपाकडून आमदारांना त्रासही होत आहे. रवी राणांनी माझ्यावर खोके घेतले म्हणून आरोप केला. ५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत, याचा विसर भाजपाला पडल्याचं जाणवत आहे. भाजपाच्या मंत्र्यांकडून काम थांबवली जातात, ते झालं नाही पाहिजे. कारण, सर्वांना सन्मान देणं गरजेच आहे,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र तुम्ही लिहिलं होतं? संजय राऊत उत्तर देत म्हणाले, “आम्ही एकमेकांकडे…”

“मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच होणार”

“मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागणार नाही, असं वाटत होते. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. ते दुर्दैवी असलं, तरी काही काम चांगली झाल्याने मंत्री केलं म्हणून नाराज नाही. मी नेहमी सांगतो, मंत्रिमंडळ विस्तार २०२४ नंतरच होणार आहे. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाही,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं.