राहाता : गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे छायाचित्र असलेले फलक काही तरुणांनी फाडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील लक्ष्मीनगरात घडली होती. यामुळे शिर्डीत आज मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेसंदर्भात विशाल अहिरे (वय २२), राकेश शीलावंत (वय १९) व दिनेश गोफने (वय २०) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. या घटनेत एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेबाबत फिर्याद देणारे तरुणच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याबाबत तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यास मदत झाली.
शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात संत रविदास गणेशोत्सव मंडळाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे व स्थानिक कार्यकर्त्यांचे छायाचित्रे असलेले फलक लावले होते. यातील दोन फलक फाडून नुकसान तसेच दुचाकीचे नुकसान केल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांच्या आज निदर्शनास येताच विखे समर्थक पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी घटनेचा निषेध केला. माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, माजी नगरसेवक मंगेश त्रिभूवन, सुरेश आरणे आदींनी आरोपींना पकडण्याची मागणी केली. याबाबत रविदास मंडळाचा विशाल अहिरे याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना, जे फिर्यादी होते तेच फलक फाडताना आढळले. पोलिसांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार आम्हीच केला असून, आमच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दुसरे तरुण सामील झाल्याचा राग आल्याने हे कृत्य आम्हीच केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितले. फलक फाडण्याच्या घटनेस जबाबदार धरत रविदास मंडळाचा कार्यकर्ता विशाल अहिरे व त्याच्या २ साथीदारांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.