अलिबाग: पेण र्अबन बँक घोटाळय़ांमुळे गेली दहा र्वष राजकारणापासून अलिप्त राहिलेले शिशिर धारकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी ‘मातोश्री’ वर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
साडेसातशे कोटी रुपयांच्या पेण अर्बन बँक घोटाळय़ात शिशिर धारकर हे प्रमुख आरोपी आहेत. बेनामी कर्ज बँक बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजकारणात पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला होता. पेण नगरपालिका निवडणुकीत पेण विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
एकेकाळी पेण नगरपालिकेवर धारकर घराण्याचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यांचे सहकारी कधी काँग्रेस आणि कधी भाजपमधून निवडून येत होते. धारकर यांनी काही दिवसांपूर्वी अनंत गीते यांची भेट घेतली होती. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी सोमवारी शिवबंधन बांधले.