Nagpur Assembly Session 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन म्हटले की, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळते. आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी, भाषण, पत्रकार परिषदा असा गदारोळ आपण नेहमीच पाहतो. पण या राजकीय गरमागरमीत कधी कधी हलके-फुलके प्रसंग पाहायला मिळतात. आज नागपूर येथील विधीमंडळाच्या आवारात असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. शिवसेना उबाठाचे आमदार वैभव नाईक माध्यमांशी बोलत असताना त्याठिकाणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट आले आणि त्या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी आणि हास्यविनोद पाहायला मिळाला. त्यानंतर आमदार भरत गोगावलेही तिथे धडकले आणि त्यांनी वैभव नाईक यांना शिंदे गटात येण्याची आणि मंत्रिपदाची ऑफरच देऊन टाकली.
हे वाचा >> “एकनाथ शिंदे यांची बाजू कधीच…”, उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हेंची टीका
या तीनही आमदारांची चर्चा माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. तिघांनीही एकमेकांना चिमटे, कोपरखळ्या लगावून आपल्यातील मैत्रीचे दाखले दिले. वैभव नाईक हे शिरसाट यांना उद्देशून म्हणाले, “आम्ही अनेक अधिवेशन एकत्र बसून काम केले आहे. आता या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. मात्र अजूनही संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालेले नाही. आम्ही तुमचे विरोधक असलो तरी तुमच्या मंत्रिपदाबाबत आम्हाला उत्सुकता आहे.” वैभव नाईक यांनी संजय शिरसाट यांना मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून कोपरखळी मारली.
संजय शिरसाट यांनीही हजरजबाबी वृत्ती दाखवत नाईक यांच्या कोपरखळीला उत्तर दिले. “ही आहे महाराष्ट्राची संस्कृती! माझा मित्र (नाईक) ही संस्कृती जपतोय, याचा मला अभिमान वाटतो. मला मंत्रिपद नाही मिळाले तरी माझ्या मित्राने (वैभव नाईक) जी भावना व्यक्त केली, त्याबद्दल मला आनंद वाटतो. सभागृहात भलेही आम्ही विरोधक असू पण बाहेर आपली मैत्री सोडू नका. जेव्हा केव्हा भेटू तेव्हा प्रेमाने भेटू हा संदेश वैभव नाईकने दिला आहे.”
एवढ्यात शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले तिथे आले. त्यांना पाहून वैभव नाईक म्हणाले, “भरतशेठ गोगावले पूर्वी अधिवेशनात वेगवेगळ्या रंगाचा कोट घालून यायचे. आता त्यांनी कोट घालणे सोडले आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचीही आशा सोडली का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.”, वैभव नाईक यांनी भरत गोगावले यांना चिमटा काढताच भरत गोगावलेही उत्तर द्यायला सरसावले. गोगावले म्हणाले, “मी वैभवला सांगू इच्छितो की वैभवला जर माझा कोट चढविण्याची इच्छा असेल तर त्याला मी माझा कोट देऊन टाकतो. मंत्रिपदाची वाट पाहत मी थांबलो आहेच, वैभव जर आमच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठीही मी थांबायला तयार आहे.”
आणखी वाचा >> नवाब मलिक अजित पवार गटात! सर्वात शेवटी बसले सत्ताधारी बाकांवर, धर्मराव अत्राम यांनी व्यक्त केला होता ‘हा’ विश्वास
गोगावले यांची ऑफर ऐकून वैभव नाईक यांना लगेच पलटवार केला. “ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, ते मला ऑफर देत आहेत. शिरसाट आणि गोगावले हे माझे मित्र आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने मंत्रिपदासाठी उठाव केला होता. त्या पद्धतीने त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, याचे मला खूप दुःख वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एंट्रीमुळे गोगावले आणि शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. आता तर काँग्रेसचेही काही लोक सरकारमध्ये येणार आहेत, असे आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे यांना मंत्रिपद मिळणार की नाही?” असा टोला वैभव नाईक यांनी लगावला.
यावर संजय शिरसाट म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. त्यातून काही लोक अपात्र होणार आहेत. कोण अपात्र होणार? याचा आमचे वरिष्ठ विचार करत असतील. कदाचित आणखी इनकमिंग होणार असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला असेल. पण काही झाले तरी वैभव नाईक माझा मित्र आहे. त्यामुळे कुणीही मंत्री झाले तरी आम्हाला आनंदच होईल.