महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्त सर्वच आमदार नागपूर येथील विधीमंडळात पोहोचले आहेत. विधानपरिषधेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधीमंडळात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरे यांनी कधीच ऐकून घेतली नाही, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फुटलीच नसती. योग्य ती बाजू घेणे आणि वेळेवर कारवाई करणे, ही बाळासाहेबांची पद्धत होती. तरी संबंधितांनी शिस्त पाळली नाही, तरच कठोर होणं, हा त्यांचा पवित्रा होता. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पक्षाने कधीही त्यांची विचारणा केली नाही. शिंदे यांचे काय प्रश्न आहेत? आमदारांना निधी मिळत नाही, ठिकठिकाच्या जिल्हाप्रमुखांची साधी मागणी होती की, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट करून द्या. पण तीही मागणी पूर्ण होत नव्हती. त्याचा दबावही एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांवर होता.”

हे वाचा >> “प्रश्न इतकाच आहे की भाजपासाठी हिंदुत्व…”, ठाकरे गटाचा संसदेतील ‘त्या’ प्रकारावरून हल्लाबोल!

एकनाथ शिंदे आणि आमदारांचे म्हणणे कधी ऐकून घेतले नाही, असा आरोप करत असताना गोऱ्हे म्हणाल्या की, मी सुद्धा उद्धव ठाकरेंना विनंती केली होती की, तुम्ही जिल्हानिहाय आमदारांच्या बैठका घ्या. काही धोरणात्मक निर्णयांच्या बाबतीत आमदारांनाही निर्णयाबाबत अवगत करा, जेणेकरून आमदारांचा कामातला आत्मविश्वास वाढेल. परंतु याबद्दल काही घडलं नाही. त्यामुळे शेवटी या बाबी धुमसत गेल्या आणि त्याचा स्फोट झाला. ही वस्तूस्थिती आहे. मग अशावेळी या स्फोटाला दुसरा पक्ष जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर आतमध्ये काही अस्वस्थता नसती, तर कुणाला अशी संधीच मिळाली नसती. परंतु राजकीय भूमिका बदललेली होती. मला वाटतं बाळासाहेब असते, तर त्यांनी वेळीच राजकीय भूमिकेबद्दल सावध केले असते.

आणखी वाचा >> “उद्धव ठाकरे किती रडारड करणार?” ‘त्या’ मागणीवरून भाजपाला टोला

माझ्याबाजूने मनभेद नाही, त्यांच्या बाजूचे माहीत नाही…

“एकनाथ शिंदे यांची साथ देण्याआधी मी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअप करून माझी भूमिका कळवली होती. त्यानंतर एकदा त्यांनी मला फोन करून सांगतिले की, विधानपरिषदेत आता माझी एकच खूर्ची राहिलीये आणि ती तुमच्या दालनात आहे. मी त्यांना म्हटले की, ती खूर्ची तुमच्यासाठी कायम राहणार. एकनाथ शिंदेंनाही मी सांगितले होते की, मी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका करणार नाही”, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी टाइम्स नाऊ मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत मांडली होती. मी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर माझे त्यांच्याबरोबर काहीही मनभेद नाहीत. पण त्यांच्याबाजूने काय आहे, याची मला कल्पना नाही, असेही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.