“त्यांनी स्पेनला जाऊन…” ५० थरांच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर अनिल परबांचा टोला!

शिवसेना नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांनी स्पेनला जाऊन…” ५० थरांच्या दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर अनिल परबांचा टोला!
संग्रहित फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय टोलेबाजी करत दीड महिन्यांपूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती, असं विधान केलं आहे. यानंतर आता शिवसेना नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे ८ ते ९ थरांच्या वर दहीहंडी लागत नाही, त्यांनी स्पेनला जाऊन ५० थरांची दहीहंडी लावली असावी, असा खोचक टोला परबांनी लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली होती” या मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारलं असता, अनिल परब उपरोधिकपणे म्हणाले की, “मला असं वाटतं की आपल्याकडे ८ ते ९ थरांच्या वर दहीहंडी लागत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी स्पेनला जाऊन ५० थरांची दहीहंडी फोडली असेल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
टेंभी नाका येथे दहीहंडी पथकातील गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.”

हेही वाचा- “आम्ही ५० थरांची हंडी फोडली” टेंभी नाका दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची राजकीय टोलेबाजी

“दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

हेही वाचा- “कदाचित ते सूरत आणि गुवाहाटीत बसून गलेलठ्ठ…”, अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांना टोला!

दरम्यान, अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं आहे. “आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडू” या फडणवीसांच्या विधानाबाबत विचारलं असता परब म्हणाले, “ही कसली दहीहंडी असते? मला माहीत नाही. मला साधी दहीहंडी माहीत आहे. कारण वर्षानुवर्षे मी हीच दहीहंडी पाहत आलोय. तसंही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करण्याचा अधिकार आहे. महापालिका निवडणुका येत आहेत.त्यामुळे कुणाची दहीहंडी फोडायची? हे लोकांना ठरवू द्यावं. पण आम्ही श्रीकृष्ण जन्मदिन साजरा करतोय, ते कोणती राजकीय दहीहंडी साजरी करत आहेत, ते मला माहीत नाही” असंही परब यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena leader anil parab on cm eknath shinde 50 layered dahihandi devendra fadnavis rmm

Next Story
दहिहंडीच्या उत्सवाला गालबोट; थर रचण्याच्या नादात मुंबईत ७८ गोविंदा जखमी
फोटो गॅलरी