शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून मागील काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. संबंधित ठिकाणी दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. मात्र, यावर अद्याप पालिकेनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हा राजकीय पेच वाढत चालला आहे. दरम्यान, शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची स्पष्ट भूमिका मांडावी. असं झालं तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल. या भूमिकेचं आम्हीही स्वागत करू, असं विधान राहुल शेवाळे यांनी केलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- “हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…” अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटलांची जोरदार टीका!

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना राहुल शेवाळे म्हणाले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी आम्ही जेव्हा परवानगी मागतो, तेव्हा हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही परवानगी मागत असतो. शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची दिशा संपूर्ण देशाला मिळते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट म्हणून आम्ही महापालिकेत अर्ज केला आहे. दुसरा गट हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे.

हेही वाचा- “…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची परंपरा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा एक गट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारा गट नाही. त्यामुळे परवानगी कोणाला द्यायची? यावरून महापालिकेपुढे कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे की, शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटलं पाहिजे. शिवाजी पार्कवरून त्यांचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रहिताचे विचार प्रकट झाले पाहिजेत.

हेही वाचा- “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंना उद्देशून राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, जर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आणि त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी ती सभा आयोजित करायची असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण तत्पूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. आमचा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी जाहीर करायला पाहिजे. तरच शिवसैनिकांमध्ये संदेश जाईल की, शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रकट होतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp rahul shewale on shivaji park dasara melava uddhav thackeray mahavikas aghadi rmm