शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याची कारणे सांगितली आहेत. दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगेश कदम यांनी ट्विट करत राष्ट्रवागी काँग्रेसवर आरोप केले आहेत. “सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक!,” असे योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आवश्यक संख्याबळ पूर्ण असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा

दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मंगळवारपासून एकानंतर एक शिवसेना आमदार शिंदे गटात जाऊन दाखल होत आहे. गुरुवारी शिवसेनेचे पाच आमदार गुवाहाटी दाखल झाल्यानंतर शिंदे गटाने आपल्याकडे आलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांची आणि नऊ अपक्ष आमदारांची यादी जाहीर केली होती. शुक्रवारी शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे आता गुवाहाटीत शिंदे यांच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३८ झाली आहे तर नऊ अपक्षांसह एकूण ४७ आमदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत.

बंड करणारे आमदार पराभूत होण्याची राज्यात परंपरा

या सर्व घडामोडी नंतर शुक्रवारी आपल्याला आवश्यक असलेले संख्याबळ पूर्ण झाले असल्याचा आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात हवे असलेले बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. आमच्या आमदारांची बैठक होईल आणि त्याच्या पुढील दिशा ठरवली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबईत कधी येणार यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

भाजपाला दुसरा हिंदुत्ववादी पक्ष नको – उद्धव ठाकरे</strong>

देशात केवळ भाजपाच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातूनच शिवसेना संपवण्याचे कारस्थान रचले आहे. आपल्याच काहींनी भाजपाला साथ देत पाठीत खंजीर खुपसला आहे, पण मी शिवसेना पुन्हा उभी करेन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. त्याआधी ठाकरे यांनी बंडखोरांना, ‘‘शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा,’’ असे आव्हान दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena rebel mla yogesh kadam explanation abn
First published on: 25-06-2022 at 09:47 IST