शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर फिरत असून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान ते बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करतानादेखील दिसत आहेत. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबांवर टीका करायची नाही, अशी भूमिका घेतलेले शिंदे गटातील नेते बोलू लागले असून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही काही बोलत नाही, याचा अर्थ आमच्याकडे मुद्दे नाहीत, असं नाही, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. दरम्यान, मनमाड दौऱ्यावर असताना बंडखोर आमदार सुहास कांदे देखील आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत. यानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

“बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला” या आदित्य ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, “मला वाटतं, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? आणि बाळासाहेबांच्या विचारांशी कुणी प्रतारणा केली? यावर मी लवकरच बोलणार आहे. आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही, तेवढी वर्षे आम्ही राजकारणात आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरेंकडून राजकारण शिकण्याची आवश्यकता आम्हाला नाही” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला आहे.

हेही वाचा- “गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” सुहास कांदेंच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी केलं आहे. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- “संविधानाच्या न्यायासाठी मोठा लढा द्यावा लागेल” संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र!

“जी वचनं दिली होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही पूर्ण करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेलं नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करून दिले. पण आता काहीही आरोप लावले जात आहेत. या टीकेला मी उत्तरं देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी कांदे यांचे नाव न घेता केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena senior leader ramdas kadam on aditya thackeray and uddhav thackeray rmm