लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : कवठेमहांकाळ बस आगारासमोरील काही दुकाने रविवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून पाटील होंडा शोरुममधील ३५ दुचाकी जळाल्या आहेत. दुपारपासून सुरु असलेल्या आगीच्या तांडवात परिसरातील १५ हून अधिक दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा कयास आहे.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाविषयी ओबीसी नेत्यांची विधाने राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात – चंद्रकांत पाटील

कवठेमहांकाळ बस स्थानकासमोर दुकानांची रांग आहे. रविवारी एका बेकरीमध्ये प्रथम आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत बाजूच्या १५ हून अधिक दुकानाना कवेत घेतले. नगरपंचायतीकडे आग विझवण्यासाठी कोणतीच साधने, बंब नसल्याने यंत्रणा बाहेरील ठिकाणाहून येईपर्यंत आग वाढत गेली. आगीत दुचाकी वाहनासह दुकानातील साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळपर्यंत तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.