लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याबाबत अधिसूचनेचा मसुदा महायुती सरकारने प्रसिध्द करून सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे ओबीसी समाजात कोणतीही नाराजी नाही. नागरी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात केलेली विधाने ही केवळ राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठीच असतात, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सोलापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य विभागीय संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील हे व्यग्र असतानाच त्यांनी ओबीसी नेत्यांच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या विधानावर हे वक्तव्य केले.
आणखी वाचा-‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणणार का?’, पंकजा मुंडेंच्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले…
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देताना इतर ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न देण्याची शासनाची भूमिका आहे. त्याप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उफमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजाचे पूर्णतः समाधान केले आहे. शासनाचा निर्णय ओबीसी नेत्यांसह समस्त ओबीसी समाजाला मान्य असेल, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.
तथापि, मराठा आरक्षणाच्या संदर्भात विपरीत भूमिका घेणारे भाजपचे नेते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या अधिसूचनेच्या मसुद्यावर काही प्रश्न ट्वीटद्वारे उपस्थित केले आहेत. त्यावर बोलताना पाटील यांनी सावध पवित्रा घेतला. नारायण राणे यांनी नेमके काय म्हटले, हे आधी मी समजून घेईन, असे ते म्हणाले.
आणखी वाचा-“…तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील”, मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीत स्पष्ट केली भूमिका!
आमदार नितेश राणे यांनी उत्तर प्रदेश व मुंबईतील मीरारोडच्या धर्तीवर सोलापुरातही लवकरच बुलडोझर चालविण्यात येणार असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरही बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, काल सोलापुरात नितेश राणे यांच्या माझी भेट झाली. त्यावेळी आमच्यात सविस्तर चर्चाही झाली. राणे यांनी अनेकवेळा बुलडोझरसंबंधी वक्तव्ये केली आहेत. परंतु बऱ्याचवेळा माणूस बोलतो एक आणि प्रसार माध्यमांतून दाखविले जाते दुसरेच. यासंदर्भात नितेश राणे यांच्याशी सविस्तर बोलतो आणि मगच भूमिका मांडतो, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.