पंढरपूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षा निमित्त पंढरीत आजपासून श्री ज्ञानेश्वरी चिंतन संमेलनाचे आयोजन केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग – सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन आयोजित करण्यात आले. येथील संत तुकाराम भवन येथे ४ व ५ ऑक्टोबर रोजी हे संमेलन होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री ज्ञानेश्वर चिंतन संमेलनाचे आयोजन केले आहे. या बाबत मंदिर समितीच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. दोन दिवसीय संमेलनाचे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर हे प्रास्ताविक व स्वागत करणार आहेत. आचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाची भूमिका सादर करतील. तर ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे बीज भाषण, त्या नंतर ह.भ.प. भागवत महाराज साळुंके यांच्याकडून श्री निवृत्ती – ज्ञानदेव संवाद होईल.
तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी “श्री ज्ञानेश्वर महाराज अद्वितीय तत्वज्ञ” या विषयावर उल्हास घोडके, इंदुताई खेडकर, प्रा. सुदाम देवखिळे, सुचित्रा भालेराव, संजय खेले यांचा सहभाग असून, या परिसंवादाचे अध्यक्ष दिलीप धनेश्वर असणार आहेत. या नंतर श्रीमद् भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील पात्रांचा तौलनिक विचार या विषयांवर ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे व्याख्यान तर ह.भ.प. जयवंत महाराज बोधले श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित अमृतानुभव, अभय टिळक “श्री ज्ञानदेव, ज्ञानदेवी आणि भाषा व्यवहार यावर व्याख्याने देणार आहेत, अशी माहिती औसेकर महाराज यांनी दिली.
या संमेलनाचा समारोप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ह.भ.प. उमेश बागडे हे कार्यक्रमाचे समन्वयक असणार आहेत. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे संमेलनाचा संपूर्ण आढावा सादर करतील. त्यानंतर संत पूजन, आभार प्रदर्शन व सामूहिक पसायदानाने संमेलनाची सांगता होईल, असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.