सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिव पुतळा कोसळल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला संशयीत बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याचा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. तो दि. २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या नंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी मालवण पोलीस ठाण्यात शिव पुतळा शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर डॉ. चेतन पाटील याला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
जिल्हा न्यायालयात जामिनासाठी डॉ. चेतन पाटील यांने आपल्या वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर सुनावणी झाली. आज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच.डी गायकवाड यांनी जामीन नाकारत अर्ज फेटाळला. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी, रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला.
© The Indian Express (P) Ltd