सावंतवाडी : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळी एमआयडीसी आणि सातार्डा येथील उत्तम स्टिल कंपनी यांसारखे प्रकल्प केवळ रोजगाराचे गाजर ठरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांची मोठी फरपट होत असून, तरुण पिढीमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पाचशे ते एक हजार तरुणांना रोजगार देऊ शकेल असा एकही मोठा प्रकल्प नाही. जिल्ह्याच्या पर्यटनाचा मोठा गाजावाजा केला जातो, मात्र पंचतारांकित हॉटेल्स विकसित करण्यासाठी आवश्यक हालचाली होताना दिसत नाहीत. ताज ग्रुपचे वेळागर येथील हॉटेल देखील रखडलेले आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर राजकीय नेते फक्त नोकरीची आश्वासने देऊन आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तरुण पिढी करत आहे.

​आडाळी एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर प्रकल्प सुरू करण्यात दिरंगाई झाली. एमआयडीसी मंजुरीनंतर जो मोठा गाजावाजा झाला, तेवढा रोजगार निर्मितीसाठी झाला नाही. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणीही गांभीर्याने पाठपुरावा करत नसल्याची खंत तरुणाई व्यक्त करत आहे.

​राजकीय उदासीनता आणि प्रकल्पांची दिरंगाई

​राजकीय नेत्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्मितीची जबाबदारी देण्याची मानसिकता नाही. ते फक्त मोठ्या कंपन्यांचे गाजर दाखवत आहेत. ग्रामपंचायतीपासून महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत एकाच विचारांचे सरकार असतानाही रोजगार निर्माण करणारे प्रकल्प का आणले जात नाहीत, असा थेट प्रश्न तरुण पिढी विचारत आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे खासदार, आमदार, पालकमंत्री आहेत आणि उद्योगमंत्री तर सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. तरीही हे प्रकल्प केवळ रोजगाराचे गाजरच ठरत आहेत. तरुणाईला रोजगारासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. ​कुडाळ एमआयडीसी आणि आडाळी एमआयडीसी परिसरात प्रकल्प येऊ शकतात. मग हे प्रकल्प आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना कुणी अडवले आहे, असा प्रश्नही तरुण पिढीने उपस्थित केला आहे.

​उत्तम स्टिल कंपनी आणि जमिनी परत करण्याची मागणी

​सातार्डा येथील उत्तम स्टिल कंपनी सुरू होण्याची तरुण पिढी वाट पाहत आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत. जर तिथे प्रकल्प उभे राहायला अडचणी येत असतील, तर त्या जमिनी परत कराव्या अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.

​गोव्यातील नोकरी आणि अपघाताचे भय

​रोजगारासाठी गोवा राज्यात जाणाऱ्या तरुण पिढीला अपघाताचे भय सतत सतावत आहे. अजून किती तरुणांना अशा अपघातांत आपले जीव गमवावे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ​अलीकडेच गोवा राज्यात एका कंपनीतील नोकरभरतीवरून तेथील विरोधी पक्षनेत्यांनी स्थानिक तरुणांना नोकरी मिळालीच पाहिजे असा आग्रह धरला. यामुळे येथील तरुणांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या महत्त्वाच्या विषयावर राजकीय वर्तुळात कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस दिशा ठरवून प्रयत्न केले जात नसल्यामुळे तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.