सांगली : जगभरात मिरजेची ओळख असलेली सतार आणि तानपुरा या तंतूवाद्यांना भौगोलिक मानांकन प्रदान करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर तसेच सोलट्यून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष मुबिन मिरजकर, अल्ताफ पिरजादे आणि सर्फराज शहापुरे यांनी स्वीकारली. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.

मिरजमधील तंतूवाद्यनिर्मितीची परंपरा तब्बल १५० वर्षांहून अधिक काळ अव्याहत सुरू आहे. याच परंपरेचा सन्मान करत, प्रथमच या वाद्यांना अधिकृत भौगोलिक ओळख प्राप्त झाली आहे. या मानांकनामुळे मिरजेत वाद्यांची नक्कल करणे किंवा मिरज नावाचा अन्यत्र वापर करून विक्री करणे प्रतिबंधित होणार आहे. या भौगोलिक मानांकनामुळे मिरजेतील वाद्यांना देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी ओळख मिळेल. स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वाद्यांना आता निर्यातीसाठी नवे दालन खुले झाले असून, त्यांना दर्जेदार व ब्रँडेड ओळख प्राप्त होणार आहे.