अलिबाग – अलिबाग तालुक्यातील खैरवाडी येथे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे. मांत्रिकांच्या बतावणीवर विश्वास ठेवीत मुलाच्या मुत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून गावकी भरवून एका कुटूंबास वाळीत टाकण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी रामराज-खैरवाडी येथील ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेली चार वर्षे हे कुटुंब सामाजिक बहिष्कार सहन करीत होते.
खैरवाडी येथील धर्मा दामू गडखळ यांचा १५ वर्षीय मुलगा कुणाल अचानक आजारी पडला. या आजारपणातच त्याचा सन २०१९ मध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर पाटवाडी गावातील मांत्रिक लहू गडखळ व मधू गडखळ यांच्याकडे ते गेले. खैरवाडी गावातील तुकाराम दरोडा यांनी तुमच्या मुलावर देवदेवस्की केली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असे या मांत्रिकांनी त्यांचे कान भरले.
गडखळ कुटुंबाच्या मानगुटीवर संशयाचे भूत बसले. त्यांनी तातडीने गावकीची बैठक बोलावली. १६ सप्टेंबर २०२१ रोजी गावातील समाज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत तुकाराम दरोडा यांच्यावर देवदेवस्की व करणीचा ठपका ठेवण्यात आला. त्याचा दंड म्हणून तुकाराम दरोडा यांच्याकडे गावकीने ६० हजार रूपये दंडाची मागणी केली. दरवडा यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने गावकीचे पंच व ग्रामस्थ अशा ३३ जणांनी दरोडा कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंजूर करून दरोडा कुटुंबाशी संबध ठेवणारांस प्रत्येकी रूपये ५ हजार रूपये दंड ठेवण्यात येईल व संबंध उघडकीस आणून देणारयास १ हजार बक्षीस देण्यात येईल, असे घोषीत करण्यात आले.
दरोडा कुटुंबावर सामाजीक बहिष्कार टाकल्याने गावातील सामाजीक धार्मिक रूढीरिवाज, विधी परंपरेचे पालन करण्यास तसेच सामाजीक, धार्मिक, सामुहिक कार्यक्रमात प्रार्थना, सभा, मेळावा, मिरवणूका, यात सहभाग घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. तसेच त्यांना गावातील सुखदुःखाच्या कार्यात सहभाग घेण्यापासून, गावातील मंदिरात ,समाज मंदिरात प्रवेश करण्यापासून वंचीत ठेवण्यात आले. गेली चार वर्षे दरोडा कुटुंब हा सामाजिक बहिष्कार सहन करत होते. हा अन्याय असह्य झाल्याने अखेर तुकाराम दरोडा यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१६ कलम ३(१), (२), (३), (४), (६), (८), (९), (१०), (१३),५,६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.