सोलापूर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ६८ पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. हे सर्व पर्यटक सुरक्षित असून श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील आणखी काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आहेत किंवा कसे, याबाबतची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासन पर्यटन कंपन्यांशी संपर्कात आहे.

या भीषण दहशतवादी हल्ल्यात सोलापूर जिल्ह्यातील एकही पर्यटक मृत किंवा जखमी झाला नाही. मात्र तरीही जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

या संदर्भात सकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन गावनिहाय पर्यटकांच्या याद्या तयार करण्याच्या तसेच तालुकास्तरावरील पर्यटन चालकांच्या संपर्कात राहून पर्यटकांची नावे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

माढा तालुक्यातील पिंपळनेर गावचे सरपंच राहुल पेटकर हे ४७ पर्यटकांसह श्रीनगर येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. याशिवाय आणखी दुसऱ्या हॉटेलमध्ये २१ पर्यटक थांबले आहेत. पिंपळनेरचे सरपंच पेटकर यांच्यासह इतरांशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधून त्यांच्या व सोबतच्या सर्व पर्यटकांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली. तसेच त्यांना सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.

जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांनी व त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी (दूरध्वनी क्र. ०२१७-२७३१०१२) किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले (९८२२५१५६०१), सहायक महसूल अधिकारी मदनसिंग परदेशी (९८२३०६५०९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.