पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पूर ओसरू लागला आहे. मात्र, संकटे पाठ सोडत नाहीत. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. तर पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, तसेच पुरामुळे पसरलेली दुर्गंधी, चिखल यामुळे साथरोग पसरू नये म्हणून आरोग्य सुविधा तत्काळ द्यावी, अशी मागणी आहे. दरम्यान, सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा सीना कोळेगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यात आलेला पूर आता ओसरू लागला आहे. त्यामुळे ज्या गावांत पाणी ओसरले तेथील ग्रामस्थांनी घर आवरण्यास सुरुवात केली. पुरामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. जे वाचले तेही भिजल्यामुळे खराब झाले आहे. घरात सर्वत्र चिखल साचला आहे. दुसरीकडे या स्वच्छतेसाठीही पाणी नाही. अनेक गावांतील पाणी योजना या पुरात वाहून गेल्या किंवा नादुरुस्त झाल्या आहेत. विहिरी गढूळल्या आहेत. पूरबाधित भागात पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी कुठून मिळवायचे याचीही चिंता या वाडीवस्तींवरील नागरिकांना लागलेली आहे.
खंडित वीजपुरवठा
पुरानंतर जिल्ह्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा बंद झाला आहे. अनेक खांब पडले आहेत. यंत्रणेत पाणी जाऊन ती नादुरुस्त झाली आहे. त्याची दुरुस्ती होऊन वीजपुरवठा सुरू होण्यास पुढील काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील स्वच्छता, कामे ही दिवसाउजेडीच करावी लागत आहेत.
पुरात चारा वाहून गेल्याने वा भिजल्याने जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सध्या सर्वत्र पाणी असल्यामुळे या जनावरांना चारा उपलब्ध होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे गावोगावी चारा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली जात आहे.
आरोग्याचा प्रश्न
पुरामुळे भिजलेली पिके, चारा, मृत जनावरे यांच्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, यातून या भागात आरोग्याचाही मोठा प्रश्न तयार झाला आहे. दूषित पाणी, अन्नधान्य यामुळे गेल्या काही दिवसांतील बिघडलेल्या दैनंदिन जीवनामुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यासाठी गावोगावी आरोग्य सुविधा देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहरात गुरुवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी साचू लागले आहे. पंढरपुरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढील दोन दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे पूरग्रस्त धास्तावले आहेत. सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील ७९२ गावे बाधित
सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे ७९२ गावे बाधित झाली. यांतील ४० गावांमध्ये पुराचे पाणी जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून १५६ जनावरे, १८००० कोंबड्याही मृत झाल्या आहेत. ८३३ घरांची अंशत: पडझड झाली आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन लाख २३ हजार ६६१ इतकी आहे. बाधित शेतीक्षेत्र एक लाख ९६ हजार ५६१ हेक्टर, तर ४४१७ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.