सोलापूर : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळण्याच्या व्यसनातून जवळचे सर्व पैसे संपविले, निवृत्त रखवालदार असलेल्या पित्याने आयुष्याच्या संध्याकाळासाठी ठेवलेली बँकेतील मुदत ठेव मोडत ती रक्कमही खर्च केली. त्यातून क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी चार सावकारांकडून पैसे काढले. त्यातून सावकारांनी ३० ते ४० टक्के व्याजदराने कर्जवसुलीसाठी लकडा लावून आई-वडिलांच्या नावे असलेली शेतजमीनही काढून घेतली. ही कहाणी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील महादेव शंकर गुरव (वय २८) याची. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित चार सावकारांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असे अनेक महादेव सोलापूर जिल्ह्यात सापडतात. ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. महादेव गुरव हा गावातील एनटीपीसी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पात नोकरी करीत असताना त्यावर सुखाने संसार चालत असताना त्यास आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळण्याचे व्यसन लागले. स्वतःजवळचे पैसे संपल्यानंतर पुन्हा क्रिकेटवर सट्टा खेळण्याची चटक त्याला गप्प बसू देत नव्हती. त्याने गावातील चार खासगी सावकारांकडून २० हजार ते ५० हजारांपर्यंत व्याजाने पैसे काढले. परंतु, दोन महिन्यांनंतर सावकारांनी त्यास चक्क ३० ते ४० टक्के व्याज भरण्यासाठी लकडा लावला. सावकारांनी गावात त्याचे चालणे-फिरणे मुश्कील करून टाकले. पुढे महादेव गुरव यांस सावकारांनी बुलेट दुचाकीवरून पळवून नेले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा सोडून दिले.
पुढे गावात पंचायत बसली. पंचायतीसमोर महादेव याने एका सावकाराला एक लाख २५ हजार, दुसऱ्या सावकाराला एक लाख, तिसऱ्या सावकाराला ५५ हजार आणि चौथ्या सावकाराला एक लाख रुपये देऊन टाकले. त्याला आता मोकळा झाल्यासारखे वाटले. परंतु, त्यानुसार सावकारांचे समाधान झाले नाही. महादेव यास पुन्हा पळवून सोलापुरात आणले आणि १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्क पेपरवर आपण हातउसने घेतलेले पैसे देणे लागतो आणि त्याची हमी देतो, असे लिहून घेतले. पुढे त्याच्या आई-वडिलांच्या शेतजमिनीवर सावकारांचा डोळा गेला. त्यासाठी पुन्हा दबाव, अपहरण, मारहाण, दमदाटी असा खेळ महादेवाच्या वाट्याला आला.