सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ही इनोव्हा कार भरधाव वेगाने जात असल्यानं पोलिसांनी संशयावरून पाठलाग केला आणि थांबवून झडती घेतली. यावेळी गाडीत सव्वा कोटी रूपये किमतीचा ६२३ किलो गांजा सापडला. या कारवाईच्यावेळी मोटारीतील तिघाजणांपैकी दोघे पळून गेले. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात परिमंडळ विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यातील फौजदार सूरज मुलाणी हे हवालदार अमृत सुरवसे व प्रकाश राठोड यांच्यासह रात्री विजापूर महामार्ग परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेली इनोव्हा मोटार तशीच निघून पुढे गेली. त्यामुळे मुलाणी यांना संशय आला. त्यांनी इनोव्हा मोटारीचा तात्काळ पाठलाग करून पुढे काही अंतरावर अडविले.

पोलिसांना पाहताच २ आरोपींचं पलायन

पोलिसांनी गाडी अडवल्यानंतर मोटारीतून दोन आरोपींनी पोलिसांना पाहताच चपळाईने पलायन केले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली आणि वाहन चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी मोटारीत गांजा भरलेली पोती असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या मोटारीसह संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा : मुंबई एनसीबी पथकाची नांदेडमध्ये मोठी कारवाई, ११२७ किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम ‘कनेक्शन’

१ कोटी २४ लाख रूपये किमतीचा ६२३ किलो गांजा जप्त

पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार करीत गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता ६२३ किलो इतका गांजा आढळून आला. त्याची किंमत सुमारे १ कोटी २४ लाख रूपये एवढी असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. कडूकर यांनी सांगितले. या गुणावत्तापूर्ण कारवाईबद्दल पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur police action on ganja of more than 1 crore rupees value came from karnataka pbs