सोलापुरमधील एका व्यापाऱ्याच्या घरावर चोरांनी आठ लाखांचा डल्ला मारल्याची घटना घडलीय. सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथे राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यात ही चोरी झालीय. चोरांनी बंगल्याचं कुलूप तोडून घरातील तब्बल आठ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आलीय.

व्यापाऱ्याच्या घरामध्ये घडलेला चोरीचा प्रकार काल (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी खान हे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मावशीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी पुणे येथे गेले होते. याच दरम्यान अज्ञातांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दागिने चोरले.

अफसर खान हे मंगळवारी पहाटे पुणेहून सोलापुरात आले.घरी आल्यानंतर त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. आत जाऊन पाहिले असता त्यांच्या घराचा दरवाजा पुढे करण्यात आलेला दिसून आला. घरात जाऊन पाहिले असता, कपाट फोडून चोरी केल्याचे आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली.

खान यांच्या घरातील कपाटांमध्ये ठेवलेले दोन लाख ४० हजार रुपये किंमतीचे नेकलेस, दोन लाख ४० हजार रुपये किंमतीचा अन्य एक हार, २ लाख ४० हजारांच्या चार सोन्याच्या बांगड्या,३० हजार आणि ४५ हजार किंमत असणाऱ्या दोन अंगठ्या, ३० हजारांची सोनसाखळी, ३० हजारांचे कानातील झुमके असे एकूण ८ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान, मंत्री चंडक अंगण परिसरातीलच हार्डवेअरचे व्यापारी जुनेस तिम्बसवाला यांचेही घर फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील कपाट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी दिलीय.