रत्नागिरी – कोकणातील निसर्ग सौंदर्याची भुरळ मराठी, हिंदी सिनेसृष्टी नंतर आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला देखील पडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत असून या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.
या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त सैतवडे गावात दाखल झाला आहे. सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे.
‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचा बेस १९०० सालातील असून, त्यावेळच्या ब्रिटिशकालीन माहितीवर आधारित कथानक तयार करण्यात येत आहे. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील शूटिंग गावाशेजारच्या वरवडे येथे होणार आहे. हे चित्रीकरण पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत.
सैतवडे गावातील बोरसही मोहल्ला येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जवळपास साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सैतवडे गावात ‘सागर प्रेमी सैतवडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रपट तयार केला जात असल्याने स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
