प्रदीप नणंदकर लातूर :
गेल्या आठवडयात सोयाबीनचा भाव ५३०० प्रतिक्विंटल होता तो घसरून आता चार हजार ९०० पर्यंत खाली आला आहे. सोयाबीनच्या भावात गेल्या दोन वर्षांपासून तेजी नाही. सतत भावात घसरण होते आहे. सोयाबीनचा हमीभाव चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल आहे. या वर्षी खरीप हंगामात पावसाने ताण दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षाही अधिक घट झाली आहे. भांडवली खर्च वाढता व उत्पादन कमी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनच्या भावात गेल्या आठवडयात चारशे रुपये वाढ झाल्यामुळे शेतकरी भाव वाढेल अशी आशा बाळगून होता; मात्र आता आठवडय़ाभरात चारशे रुपयांनी भाव घसरले आहेत.
हेही वाचा >>> सांगली : हो-नाही करत माजी महापौर सुर्यवंशी अजित पवारांच्या गटात
सोयाबीनच्या भावात घट होण्याची जी कारणे व्यक्त केली जात आहेत त्यात दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याशिवाय तांदळापासून जी पेंड तयार केली जाते त्याच्या निर्यातीवरील बंदीला एक वर्षांची केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. सोयाबीनचे भाव वाढले, तर सोयाबीनच्या पेंडीलाही निर्यात बंदी येऊ शकते या भीतीने सोयाबीनचे भाव वाढू दिले जात नसल्याचा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये हवामान बदलावरून बाजारपेठेत सट्टेबाजी केली जाते. कारण ब्राझीलमधील सोयाबीनचे उत्पादन हे भारताच्या १६ पट आहे. पाऊस पडला की उत्पन्न अधिक होईल व दोन दिवस ऊन पडले तर दुष्काळ पडेल अशी चर्चा करत भावातील चढ-उतार होते आहे. त्याचाही फटका देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला बसतो आहे. खाद्यतेलावर आयात शुल्क नसल्याने परदेशातून मोठय़ा प्रमाणावर खाद्यतेल मागवले जाते. सध्या आफ्रिकेतील खाद्यतेल मोठय़ा प्रमाणावर भारताच्या बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे त्याचाही परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव न वाढण्यावर होतो. त्यातूनच सोयाबीनचे भाव घसरत आहेत.